- हरीश गुप्ता नवी दिल्ली : गेल्या वर्षी विघातक शक्तींनी विदेशातून भारतावर ११.५८ लाख सायबर हल्ले चढविले आहेत. २०१९ साली ही संख्या ३.९४ लाख होती. म्हणजे एका वर्षात या हल्ल्यांत सुमारे ३०० टक्के वाढ झाली. सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.
हल्ले रोखण्यास यंत्रणा सज्जसायबर हल्ल्यांपासून सुरक्षित कसे राहावे याचा आजवर ५९ वेळा केंद्राने सराव केला. त्यात देशातील ५६५ संस्था सहभागी झाल्या होत्या. केंद्राने राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची (एनसीसीसी) स्थापना केली आहे. हल्ले टाळण्यासाठी संबंधित सरकारी खाती, संस्थांना एनसीसीसीकडून सूचना दिल्या जातात.
विदेशातून सहा लाख हल्ले - सायबर हल्ले रोखण्याचे काम इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीममधील (सीईआरटी-इन) तज्ज्ञ मंडळी करतात. यंदाच्या वर्षी जून अखेरपर्यंत भारतावर विदेशातून सहा लाख सायबर हल्ले झाले आहेत. - सायबर हल्ल्यांचा धोका असलेल्या देशातील ७०० संस्था, यंत्रणा, उद्योगांना सीईआरटी-इनच्या तज्ज्ञांनी याआधीच सावध केले आहे. - हे हल्ले परतवण्यासाठी असलेली यंत्रणा अद्ययावत करा, अशी सूचना दिली आहे. हल्ले रोखण्यासाठी सरकारनेही पूर्वतयारी केली आहे. - केंद्रातील विविध खाती, राज्य सरकारांचे विविध विभाग, त्यांच्या संस्था, यंत्रणा, त्यांच्या वेबसाइट, तसेच ऑनलाइन व्यवहाराच्या यंत्रणा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.