मुंबई - गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला. नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला येणार असल्याचेही समजते. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण हे सर्वच क्षेत्रा लता दिदींना जवळचे होते. त्यात, त्या क्रिकेटच्या मोठ्या चाहत्या होत्या. त्यामुळेच, सुनिल गावस्करपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत त्यांचे जिव्हाळयाचं नातं होतं.
लता मंगेशकर यांचा लहान भाऊ ह्रदयनाथ हे क्रिकेट खेळायचे. त्यामुळे, लता दिदींना क्रिकेट खूप आवडायचं. संगीतानंतर त्यांनी क्रिकेटवर प्रेम केलं. म्हणूनच, सचिन तेंडुलकर आणि त्यांचं नातं हे आई-मुलाप्रमाणे होतं. सचिनच्या आग्रहाखातर तू जहाँ जहाँ रहेगा, मेरा साया साथ होगा.... हे गाणं लता दिदींनी एका कार्यक्रमा गायलं होतं. तर, आयपीएल 2018 ची फायनल मॅचही सचिनच्या कुटुंबीयांसोबत लता दिदींनी एकत्र बसून पाहिली होती.
आयपीएलच्या सिझनमध्ये चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील 2018 सालच ही लढत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लता दीदींना एक ट्विट केले होतं. ज्यामध्ये, त्यांनी सचिन आणि अंजली यांच्यासमवेतचा फोटो शेअर केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ''काल बऱ्याच दिवसांनी सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आमच्या घरी आले होते. आम्ही सर्वांना एकत्र आयपीएल 2018 ची चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेली फायनल मॅच पाहिली.'' लता दीदींचे ते ट्विट चांगलेच चर्चेत आले होते. या दोन्ही दिग्गज व्यक्तींना एकत्र पाहून सर्वांना आनंद झाला होता.
खेळाडूंसाठी जमवले होते २० लाख रुपये
सुनिल गावस्कर यांच्यापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंतच्या अनेक खेळाडूंचे त्या कौतुक करत. १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकल्यावर लता दीदींना एक खास शो केला होता. हा शो भारतीय खेळाडूंसाठी होता. त्यातून जमा झालेली २० लाख ही रक्कम खेळाडूंना देण्यात आली होती. आज क्रिकेटमध्ये जितका पैसा मिळतो तेवढा तेव्हा मिळत नसे. वर्ल्डकप जिंकलेल्या खेळाडूंना जितके पैसे मिळायला पाहिजे होते तेवढे मिळाले नव्हते. त्यामुळे लता दीदींना हा शो केला होता.