मुंबई: भारतासह जगभरातील श्रोत्यांना अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर आज हरपला. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. लता दीदींच्या जाण्याने आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. गेल्या 28 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आपलाय इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत लता दीदींना अनेक पुरस्कार मिळाले. 2001मध्ये भारत सरकारने त्यांना सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्काराने (Bharat Ratna Award) सन्मानित केले होते. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने त्यावेळची आठवण करुन देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये लता दीदी तत्कालीन राष्ट्रपती केआर नारायण यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार स्विकारताना दिसत आहेत.
पाहा व्हिडिओ:
लता दीदींच्या जाण्याने राजकारण, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. लता मंगेशकर आज आपल्यात नसतील, पण त्यांच्या आवाजातून त्या सदैव अजरामर राहतील. त्यांच्या आवाजात वेगळीच जादू होती, जी ऐकून श्रोते मंत्रमुग्ध व्हायची. त्यांच्या या आवाजातील जादूमुळेच त्यांनी इतके वर्षे संगीत क्षेत्रावर राज्य केले.