मुंबई, दि. 10 - इतक्या रात्री उशिरा तिला घराबाहेर राहण्याची काय गरज होती...एखाद्या तरुणीवर बलात्कार झालेला असो किंवा विनयभंगाची घटना घडलेली असो, सर्वात आधी हे वाक्य कानी पडतं. मग संस्कृतीचे रक्षक उभे राहून आरोपी कसा योग्य आहे आणि पीडित तरुणी कशी चुकीची आहे हे पटवून देण्यासाठी आपल्या पुर्वजांपासूनचे दाखले देण्यास सुरुवात करतात. इतक्या रात्री ती तरुणी घराबाहेर पडली म्हणूनच हे सगळं झालं...या लॉजिकच्या आधारे पीडित तरुणीलाच आरोपी ठरवलं जातं. विशेष म्हणजे या सगळ्या घटनाक्रमात आरोपी तरुण मात्र मोकाट फिरत असतो, कारण तरुणीने त्याला उकसवलेलं असतं, ज्यामध्ये त्याची चूक असण्याची शक्यता शून्य असते.
आधीच आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगामुळे अंधा-या कोप-यात ढकलल्या गेलेल्या त्या तरुणीचं खच्चीकरण कऱण्याचं कामच एकाप्रकारे चालू असतं. हरियाणामध्ये आएएस अधिका-याच्या मुलीचा करण्यात आलेला पाठलाग आणि त्यानंतर आरोपी तरुणाला बाजूला ठेवून पीडित तरुणीवरच ओढण्यात आलेले ताशेरे यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याला उत्तर म्हणून तरुणींनी ट्विटरवर लेट नाईट फोटो शेअर करत उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटर पुकारलेल्या या सामाजिक लढ्यातून तरुणींनी आपल्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
घटनेनंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष रामवीर भट्टी यांनी वक्तव्य केलं होतं की, 'तरुणीने रात्री 12 वाजल्यानंतर घराबाहेर पडायला नको होतं. इतक्या रात्री उशिरा ड्रायव्हिंग करण्याची तिला काय गरज होती ? वातावरण चांगलं नाही आहे. आपणच आपली काळजी घेतली पाहिजे'.
भाजपाच्या खासदार किरण खेर यांनी मुली व मुलांमध्ये भेदभाव न करता दोघांनाही सारखेच नियम लावायला हवेत. रात्रीच्या दरम्यान एकट्या मुलीनं रस्त्यावर फिरणे चुकीचं वाटत असल्यास तरुणांनाही रात्री घराबाहेर पडू न देता घरातच ठेवलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. तसेच तरुणींना दिवसाची भीती वाटत नाही, मग रात्रीचीच भीती का वाटते ?, त्यामुळे रात्रीचं मुलांना घराबाहेर पाठवू नका, असा सल्लाही किरण खेर यांनी दिला होता.
तरुणींनी #AintNoCinderella या हॅशटॅगसोबत लेट नाईट सेल्फी शेअर करण्यास सुरुवात केली असून व्हायरल झाला आहे.