एससी, एसटींच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, बिहारची राजधानी पाटणा येथेही या भारत बंदचे तीव्र पडसाद उमटले. त्यातच येथे आंदोलन सुरू असताना घडलेली घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे.
त्याचे झाले असे की, येथे भारत बंददरम्यान, रस्त्यावर उतरून आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मात्र हा लाठीमार करताना पोलीस शिपायांनी आपल्या पुढे मागे कोण आहे याचा विचार न करता सर्वांना लाठ्यांचा प्रसाद दिला. त्यावेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी एसडीएम साहेबही तिथे पोहोचले होते. पण लाठीमार करताना बेभान झालेल्या पोलीस शिपायांनी या एसडीएमनाही लाठ्यांनी झोडपून काढले.
पोलीस शिपाई एसडीएम यांच्यावरच लाठीमार करताहेत हे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने मध्ये पडून शिपायांना बाजूला केले. मात्र झाल्या प्रकारामुळे एसडीएम साहेब चांगलेच संतप्त झाले. अखेरीस शिपायांनी या लाठीमाराबाबत एसडीएम यांची माफी मागितली आणि चुकून हा प्रकार घडल्याचे सांगितले. मात्र आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारत बंददरम्यान आंदोलक पाटण्यामधील रस्त्यांवर उतरून डाक बंगला चौकात डीजे लावून आंदोलन करत होते. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यावेळी एसडीएम साहेब हे तिथे डीजे वाजवण्यासाठी लावण्यात आलेला जनरेटर बंद करण्यासाठी जमावामध्ये गेले होते. मात्र पोलीस शिपायांनी त्यांना ओळखले नाही. तसेच त्यांच्यावर बेछूट लाठीमार केला.