ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - रेल्वेने सेवेत कायम करून घ्यावे, या मागणीसाठी देशभरातील अॅप्रेंटिसनी रेल्वे मंत्रालयासमोर केलेल्या निदर्शकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात अनेक जण जखमी झाले. जखमींवर उपचार करून त्यांना परत पाठवण्यात आल्याची माहिती संसद मार्ग पोलिसांनी दिली. काही जणांना अटकही करण्यात आली होती. त्या सर्वांना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आले. निदर्शकांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांची संख्या अधिक होती.केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या रेल भवन या कार्यालयापाशी जाण्याचा प्रयत्न अनेक निदर्शकांनी केल्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रातील हितेंद्र भदाणे हा तरुण या अॅप्रेंटिस संघटनेचा प्रमुख आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी आमच्यावर अमानुष पद्धतीने लाठीमार केला, आमचे आंदोलन शांततेने सुरू होते, असा या निदर्शकांचा दावा आहे.या आंदोलनात महाराष्ट्रातील जवळपास दीड हजार मुले, तर देशभरातून 10 हजार जण सहभागी झाले होते. हे अॅप्रेंटिस उद्याही दिल्लीत आंदोलन करणार आहेत. आम्हाला रेल्वे सेवेत सामावून न घेतल्यास, आम्ही प्रसंगी रेल रोकोही करू, असे आंदोलक अॅप्रेंटिसनी सांगितले.
रेल्वे अॅप्रेंटिसवर दिल्लीत लाठीमार
By admin | Published: January 31, 2017 10:02 PM