- राजकुमार जाेंधळे लातूर - औसा तालुक्यातील किल्लारी येथील गुबाळ मार्गावर असलेले एक किराणा दुकान चाेरट्यांनी फाेडून १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना साेमवारी उघडकीस आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, किल्लारी पाटी येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या किल्लारी-गुबाळ रोडवर किरणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानात असलेले राेख सहा हजार रुपयांचे चिल्लर, सिगारेट पॉकेट, सुपारी, तेलाचे डबे असा एकूण १ लाख २८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच किल्लारी येथील पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने चाेरट्यांना लवकरच पकडण्यात यश येईल, असे सहायक पोलिस निरीक्षक केदार म्हणाले.
याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक माने करत आहेत.