आशपाक पठाण, लातूर : पाणीटंचाईने तहानलेल्या लातूरकरांना काहीअंशी का असेना दिलासा मिळाला आहे. मांजरा धरणातील पाणीसाठ्यात बर्यापैकी वाढ झाली असून, नागझरी बंधार्यातही पाणी आले आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. लातूर शहराला मनपा पंधरा दिवसाला एकदा पाणी देणार असून, हे रोटेशन कायम ठेवल्यास जानेवारीपर्यंत दिलासा मिळणार आहे. लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असतानाही मनपा प्रशासनाने नागझरी बंधार्यातील पाण्याकडे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. मांजरा प्रकल्पाला कोरड पडल्याने टंचाईच्या झळा वाढल्या होत्या. कधी रेल्वेची तर कधी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू होत्या. यातच गेल्या आठ दिवसांपासून कुठे ना कुठे पाऊस पडत असल्याने पाणीसाठा वाढला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणार्या मांजरा प्रकल्पात असलेल्या १.२ दलघमी पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, सध्या ४.८५ दलघमी पाणीसाठा वाढला आहे. शिवाय, अजूनही पाणीसाठ्यात हळुहळू वाढ होत आहे. याचबरोबर नागझरी बॅरेजेसमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे. पाच दिवसांपूर्वी काटगाव, कारसा, रूई, रामेश्वर, काटगाव तांडा आदी भागांत झालेल्या पावसामुळे या भागातील पाणीसाठे वाढले असून, हे पाणी मांजरा नदीला आले आहे. त्यामुळेच नागझरी बंधार्यात पाणीसाठा वाढला आहे. तीन दिवसांपासून उपसा... मांजरा नदीवरील नागझरी बॅरेजेस बंधार्यात पाणीसाठा वाढल्याने लातूर शहर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या बंधार्यातून गेल्या तीन दिवसांपासून पाणीउपसा सुरू केला आहे. मांजरा व नागझरी दोन्ही प्रकल्पांतून पाणी उपसा सुरू असून, हे पाणी आहे त्या रोटेशनप्रमाणे वापरल्यास जानेवारीपर्यंत लातूरकरांना दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्यात नागझरी बंधार्यातील पाणी उपसा न केल्याने टंचाईत भर पडल्याची ओरड झाल्याने आता प्रशासनाने नागझरी बंधार्यातील पाण्याला प्राधान्य दिले आहे. बंधार्यावरील मोटारी बंद करून विजेचे कनेक्शनही तोडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तरीही पंधरा दिवसाला पाणी... मांजरा व नागझरी बंधार्यात वाढलेला पाणीसाठा हा दिलासा देणारा असला तरी महापालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात अद्याप बदल झालेला नाही. पंधरा दिवसांतून एकवेळा नळाला पाणी देण्यात येत होते. यापुढेही त्याच पद्धतीने नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
लातूरकरांना चार महिन्यांसाठी दिलासा ! पाणी वाढले : नागझरीतून पाणी उपसा सुरू
By admin | Published: September 11, 2015 9:09 PM