नवी दिल्ली - चंद्रावर यान उतरविण्याचं स्वप्न, 11 वर्षाची प्रचंड मेहनत आणि 960 कोटी रुपये खर्च करुन देशाचं महत्वाकांक्षी मिशन चांद्रयान 2 हे काही दिवसांच्या लांबणीवर गेलं आहे. सोमवारी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान 2 चं प्रक्षेपण होणार होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हे मिशन पुढे ढकलण्यात आलं आहे.
चांद्रयान 2 श्रीहरीकोटा येथून सोमवारी धवन स्पेस सेंटरमधून उड्डाण होणार होते. भारताने 3 लाख 84 हजार 400 किमीच्या या प्रवासासाठी चांद्रयान 2 तयार केलं. यासाठी जवळपास 960 कोटी रुपये खर्च करण्यात आले. चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणाच्या 56 मिनिटे 24 सेकंद आधी हे मिशन थांबविण्यात आलं. काही तांत्रिक खराबीमुळे मिशन अर्धवट ठेवण्यात आलं. ही मोहीम अर्धवट राहिल्याने गेल्या 11 वर्षाच्या वैज्ञानिकांच्या मेहनतीला झटका बसला आहे. तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर चांद्रयान 2 पुन्हा प्रक्षेपित केलं जाईल. त्याबाबतची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती इस्रोने दिली आहे.
इस्रोचे वैज्ञानिक सध्या या मोहीमेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत इस्त्रोचे प्रवक्ते बीआर गुरुप्रसाद यांनी सांगितले की, जीएसएलव्ही मार्क 3 मध्ये तांत्रिक समस्या आल्यानंतर चांद्रयान 2 चं प्रक्षेपण थांबविण्यात आलं. तसेच यातील अडचणी दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा इस्त्रोकडून चांद्रयान 2 चं प्रक्षेपण केलं जाईल.
वैज्ञानिकांच्या प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना टळलीप्रक्षेपणाच्या काही मिनिटांपूर्वी चांद्रयान 2 मध्ये तांत्रिक अडचण समजणं ही मोठी बाब आहे. जर ही तांत्रिक त्रुटी लक्षात आली नसती अन् चांद्रयान 2 चं प्रक्षेपण झालं असतं. तर मोठी दुर्घटना घडली असती.
भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपास्त्राच्या साह्याने हे यान चंद्रावर पाठविण्यात येणार होते. परंतु त्यापूर्वीच इस्रोनं ही मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे. या मोहिमेसाठी इस्रोचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत होते. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा या यानावर बसवण्यात आली आहे. मोहिमेतील सर्व यंत्रणा या भारतीय बनावटीच्या आहेत. या मोहिमेंतर्गत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगद्वारे रोव्हर वॉक होणार होते.