ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - भारतातील पहिला पॅनिक बटण असलेला मोबाईल फोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. एलजीने हा फोन बाजारात आणलं असून LGK10 2017 असं या मॉडेलचं नाव आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते हा मोबाईल फोन लाँच करण्यात आला. या मोबाईल फोनची किंमत 13,990 रुपये असणार आहे. सर्व प्रकारच्या फोनमध्ये पॅनिक बटण ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने एप्रिल 2016 मध्येच दिले होते.
या मोबाईलमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या बाजूला पॅनिक बटण देण्यात आलं आहे. हे पॅनिक बटण सलग तीन वेळा दाबल्यानंतर फोन आपोआप 112 या राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांकाशी कनेक्ट होईल. ज्यामुळे पोलीस, अग्नीशमन, रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधून आवश्यक त्या सेवेची मदत घेता येईल. महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी नेटवर्क असण्याची गरज नाही. नेटवर्क नसतानाही हा फोन काम करु शकेल. मात्र जीपीएस सुविधा या फोनमध्ये जानेवारी 2018 पासून सुरु करण्यात येणार आहे.