जयपूर – महाराष्ट्रात ज्याप्रकारे महाविकास आघाडीने शिवभोजन योजना सुरु केली आहे. याच धर्तीवर राजस्थान सरकारने नवीन योजना आणली आहे. राज्यातील कोणाताही व्यक्ती भुकेला राहू नये यासाठी २० ऑगस्टपासून राजस्थानात इंदिरा रसोई योजना सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी साडे ८ वाजता टोंक जिल्ह्यातून या योजनेचा शुभांरभ होणार आहे.
टोंक जिल्ह्यातील ८ मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून इंदिरा रसोई योजना सुरु करण्यात येईल. यामाध्यातून २ हजार ४०० लोकांना दररोजचं भोजन मिळेल. योजनेतंर्गत एका थाळीची किंमत ८ रुपये इतकी असणार आहे. त्याचसोबत योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात आलं आहे. योजनेत सरकार समाजसेवी संस्थांनाही समाविष्ट करुन घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गौरव अग्रवाल यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही योजना सुरु करण्यात येणार आहे. राज्यातील २१३ शहरात ३५८ किचनच्या माध्यमातून लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यातील विविध शहरातील रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड, हॉस्पिटलसारख्या प्रमुख ठिकाणी ही सुविधा सुरु असेल. जेवणाच्या थाळीत डाळ, चपाती, भाजी आणि लोणचं हे पदार्थ असणार आहेत. राज्य सरकार या योजनेसाठी १२ रुपये प्रतिथाळी अनुदान देणार आहे. योजनेचा दिवसाचा खर्च १.३४ लाख इतका आहे तर वर्षाला ४ कोटी ८७ लोकांना भोजन देण्याचा सरकारचा इरादा आहे.
राजधानी जयपूरमध्ये 20 ठिकाणी योजना सुरु होणार
जयपूरचे जिल्हाधिकारी अंतसिंग नेहरा म्हणाले की, उद्यापासून सुरू होणाऱ्या या योजनेंतर्गत राजधानीत २० ठिकाणी सुरुवात केली जाईल. यामध्ये जयपूर ग्रेटर आणि हेरिटेजमधील प्रत्येकी १० ठिकाणी सुरू केले जाईल. योजनेंतर्गत लोकांना ८ रुपयात जेवण मिळेल. जिल्हास्तरीय समिती वेळोवेळी जेवणातील पदार्थांची गुणवत्ता तपासेल. गुणवत्तेचा अभाव असल्यास तक्रार देखील दाखल केली जाईल. योजनेतंर्गत किचनमध्ये दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण बनवले जाईल. सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत जेवणाची सुविधा असेल. संपूर्ण योजनेचे ऑनलाइन परीक्षण केले जाईल.