ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.१६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्टार्ट अप सुरू व्हावेत यासाठी लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार असून स्टार्टअपला तीन वर्षांसाठी कर माफ करण्यात येणार आहे. तसेच, भारत पेटंट फी ८० टक्क्यांनी कमी करणार येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिली.
या स्टार्टअप इंडिया मोहिमेच्या कार्यक्रमात अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील स्टार्टअप कंपन्यांचे ४८ सदस्यीय प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते. तसेच, इनव्हेस्ट इंडिया, स्टार्टअप कंपन्या, आयस्प्रिट, युवरस्टोरी, नास्कॉम, शी द पीपल टीव्ही, कॅरोस सोसायटी आणि फिक्की व सीआयआयच्या युवा शाखा आणि औद्योगिक धोरण व संवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात १५०० पेक्षा अधिक स्टार्टअप प्रमुखही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी हे स्टार्टअपच्या व्हॅच्युअल प्रदर्शनीची पाहणी करत स्टार्टअप उद्योजकांसोबत चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे : -
- स्टार्टअपला तीन वर्षांसाठी कर माफ करण्यात येणार
-पेटंट रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करण्यासाठी वेगळी योजना आणणार, व त्यासाठी सरकार सहाय्यता करणार.
- स्टार्टअप प्लॅनमधल्या action plan मध्ये सेल्फसर्टिफिकेशनवर आधारीत व्यवस्था, तीन वर्षे कुठलंही इन्स्पेक्शन होणार नाही, तसेच सरकारचा त्रास होणार नाही याची आमची काळजी घेणार
- भारतात लाखो समस्या असतील पण त्यापेक्षा जास्त मेंदू आहेत, त्यामुळे समस्यांची चिंता करायची गरज नाही.
- ज्यावेळी मी स्टार्ट अप इंडिया म्हणतो त्यावेळी स्टँड अप इंडिया हे गृहीत आहे.
- गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण कसं मिळेल यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा.
- आम्ही मेक इन इंडिया म्हणतो, त्यावेळीच मेक फॉर इंडियापण म्हणतो कारण भारत सव्वा अब्ज लोकांचं हे मार्केट आहे.
- केवळ पाच लोकांना रोजगार देणारा स्टार्टअप असेल तरी तो देशाला पुढे नेणारा असेल.
- सध्या स्टार्टअप फक्त आयटी पुरतं मर्यादीत आहे, आयटीच्या पलीकडे स्टार्टअपचं काम जायला हवं.
- पैसे कमावण्यासाठी सुरू केलेलं स्टार्टअप यशस्वी होत नाही, परंतु लोकांची समस्या सोडवण्यासाठी सुरू केलेलं स्टार्टअप यशस्वी होतं आणि पैसा हा बायप्रॉडक्ट बनून मागे मागे येतो.
- जेव्हा कुठल्याही गोष्टीची सुरुवात केली जाते, तेव्हा ती करणा-यालाच दिसत असतं की काय मिळणार आहे, इतरांना ते वेडच वाटतं.
- आम्ही राजकारणी लोकांनी काय नाही करायचं हे ठरवलं तर उद्योजक १० वर्षांत देशाला कुठच्या कुठे नेऊन ठेवतील.
- मला कधी कधी वाटतं की मी तुमच्यासारखा उद्योजक का नाही झालो?