नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाची स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे आज, शुक्रवारी जलावतरण होणार आहे. कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे हा सोहळा होणार आहे.
मोदी स्वावलंबनाचे खंदे समर्थक आहेत. विशेष करून संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनावर त्यांचा विशेष भर असून, आयएनएस विक्रांतचे जलावतरण या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल असेल, असे पीएमओने म्हटले आहे. संपूर्णपणे देशात बनविण्यात आलेली ही पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. भारतीय नौदलाच्या इन-हाऊस वॉरशिप डिझाइन ब्युरोने या युद्धनौकेचे डिझाइन (रचना) तयार केले आहे.
ही युद्धनौका अत्याधुनिक स्वयंचलित सुविधांयुक्त आहे. भारताच्या सागरी इतिहासात देशात बांधण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे जहाज आहे. भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे नाव या नौकेला देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.