नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शनिवारी नवी दिल्ली येथे स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ केला जाईल. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील स्टार्टअप कंपन्यांचे ४८ सदस्यीय प्रतिनिधीमंडळ उपस्थित राहणार आहे.विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात या स्टार्टअप मोहिमेचा शुभारंभ केला जाईल. यावेळी पंतप्रधान मोदी हे स्टार्टअपच्या व्हॅच्युअल प्रदर्शनीची पाहणी आणि स्टार्टअप उद्योजकांसोबत चर्चा करतील. इनव्हेस्ट इंडिया, स्टार्टअप कंपन्या, आयस्प्रिट, युवरस्टोरी, नास्कॉम, शी द पीपल टीव्ही, कॅरोस सोसायटी आणि फिक्की व सीआयआयच्या युवा शाखा आणि औद्योगिक धोरण व संवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात १५०० पेक्षा अधिक स्टार्टअप प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.