नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरूर यांचे स्वीय सहाय्यक शिवकुमार प्रसाद यांना सोने तस्करीप्रकरणी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी या घटनेमुळे आपल्याला धक्का बसल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे.
केरळमधील तिरुअनंतपुरम मतदारसंघाचे विद्यमान खासदार शशी थरूर यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "मी निवडणूक प्रचारासाठी धर्मशाळेत होतो, तेव्हा माझ्या स्टाफमधील एका माजी सदस्याशी संबंधित घटना ऐकून मला धक्का बसला. ही व्यक्ती मला एअरपोर्ट फॅसिलिटेशन असिस्टंट म्हणून पार्ट टाईम सेवा देत होती. ते ७२ वर्षांचे सेवानिवृत्त सदस्य असून डायलिसिसमुळे त्यांना पार्ट पाईमसाठी ठेवण्यात आले होते. कायद्याने आपले काम कले पाहिजे."
दरम्यान, शशी थरूर यांचे स्वीय सहाय्यक शिवकुमार प्रसाद यांना सीमाशुल्क विभागाने दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. शिव कुमार प्रसाद हे दिल्ली विमानतळावर एका ओळखीच्या व्यक्तीकडून परदेशातून आणलेले सोने घेत होते आणि त्याचवेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. या सोन्याची किंमत जवळपास ५५.५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्था आयएनएसने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शिवकुमार प्रसाद या सोन्याबाबत माशुल्क विभागाला कोणतीही ठोस माहिती देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.