बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा देशात चर्चेत आलं आहे. आता लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाने मोठा खुलासा केला आहे की, तो जेलमध्ये असताना त्याचं कुटुंब दरवर्षी त्याच्यावर तब्बल ३५ ते ४० लाख रुपये करतं. द डेली गार्डियनच्या रिपोर्टनुसार, ५० वर्षीय रमेश बिश्नोई यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच भविष्यात लॉरेन्स गुन्हेगार होईल असं कुटुंबीयांना कधीच वाटलं नव्हतं असंही म्हटलं.
रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई यांनी सांगितलं की, "आम्ही नेहमीच श्रीमंत होतो. लॉरेन्सचे वडील हरियाणा पोलीसमध्ये कॉन्स्टेबल होते आणि त्यांची गावात तब्बल ११० एकर जमीन आहे. लॉरेन्स नेहमीच महागडे कपडे आणि बूट घालतो. त्यामुळे आताही कुटुंबीय तो जेलमध्ये असताना त्याच्यावर वर्षाला ३५ ते ४० लाख रुपये खर्च करतात."
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून, सलमान खानशी जवळीक असल्याने ही हत्या केल्याचा दावा केला आहे. मात्र, या हत्येत लॉरेन्स बिश्नोई गँगचा खरच सहभाग आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग
बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये सिद्दिकी यांच्या मुलाचा फोटो सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मास्टरमाईंडने झिशान सिद्दिकी यांचा फोटो शूटर्ससोबत स्नॅपचॅटद्वारे शेअर केला होता. शूटर्स आणि हत्येचा कट रचणाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या एप्लिकेशनचा वापर केला होता.