रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार
तपाताची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारणे ही आजवरची कट्टर अतिरेकी संघटनांची प्रथा. जयपूरमध्ये श्री राष्ट्रीय करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने थेट सोशल मीडियावर पोस्ट टाकून या हत्येची जबाबदारी स्वीकारत नव्याने पाडलेला पायंडा अधिक रूढ केला आहे. राजस्थान हादरवणाऱ्या या हत्येचे धागेदोरे पंजाब, हरयाणा, दिल्लीपासून आणि थेट पाकिस्तान, दुबईपर्यंत पसरलेले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून धुडगूस घालणाऱ्या रक्तपिपासू टोळ्यांचा बीमोड कसा होणार, हा मोठा प्रश्न आहे.
गोगामेडी यांच्या हत्येनंतर अवघ्या तासाभरातच बिश्नोई टोळीचा गुंड रोहित गोदारा याने फेसबुकवर पोस्ट टाकत आपल्याच गँगने ही हत्या केल्याची दवंडी पिटली. आता उरलेल्या शत्रूंनी त्यांच्या दाराबाहेर त्यांच्या तिरडीची व्यवस्था करण्याची धमकीही दिल्याने सरकारची हतबलता स्पष्ट झाली आहे. अभिनेता सलमान खान याला धमकी देण्याच्या घटनेमुळे बिश्नोई गँगचे नाव देशासमोर पहिल्यांदाच आले; पण या टोळीचा उच्छाद गेली अनेक वर्षे इतर राज्यांमध्ये सुरू आहे आणि आता आपण कुणाला टिपणार आहोत, हे उघड करत ही टोळी तिच्या डेथ लिस्टमधील एकेक नाव चार- सहा महिन्यांच्या अंतराने कमी करत आहे.
सहा वर्षांपूर्वी राजस्थानात सुरू झालेली बिश्नोई आणि आनंदपाल सिंह गँगची रक्तरंजित होळी आजही सुरू आहे. गँगस्टर आनंदपाल सिंह हा २०१७ साली पोलिस चकमकीत मारला गेला आणि या टोळीयुद्धाला सुरुवात झाली.
हत्या आणि खंडणीचे डझनावारी गुन्हे दाखल असलेला पंजाबचा अवघ्या तिशीतील लॉरेन्स बिश्नोई हा या टोळीचा म्होरक्या. कॉलेजमध्ये शिकत असताना कॉपी करण्यापासून मोबाइल फोन चोरण्यापर्यंतचे गुन्हे करणाऱ्या लॉरेन्सचा सध्या तिहार तुरुंगात मुक्काम असला तरी तुरुंगाच्या भिंती त्याचे गुन्हेगारी मनसुबे रोखण्यास कुचकामी ठरत आहेत.
सिद्धू मुसावालाच्या हत्येचीही सोशल मीडियावर कबुली
आनंदपाल सिंह आणि बिश्नोई टोळीतून विस्तव जात नव्हता. मे २०२२ मध्ये लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसावाला याची बिश्नोई टोळीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळीही सोशल मिडीयावर हत्येची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट टाकण्यात आली होती.
असे तोंड फुटले राजस्थानमध्ये टोळीयुद्धाला...
मुसावालाच्या हत्येनंतर सहा महिन्यांत आनंदपाल टोळीचा विरोधक राजू ठेहट याची हत्या झाली. ठेहटच्या हत्येचा कट दुबईत असलेली आनंदपालची मुलगी चिनू हिने रचल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोनच महिन्यांत सिद्धू मुसेवालाचे मारेकरी मनदीप तुफान व मनमोहन सिंह मोहना हे मारले गेले.
त्यानंतर रोहित गोदाराने उचल खाल्ली आणि त्याने बिश्नोई टोळीच्या मदतीने राजस्थानमधील आपल्या विरोधकांचे हिशेब चुकते करण्यास सुरुवात केली. आनंदपाल सिंह याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो सज्ज झाला. बनावट पासपोर्टच्या आधारे तो दुबईला पळून गेला आणि राजस्थानात एकामागोमाग एक मुडदे पाडू लागला.
सर्वप्रथम कुख्यात राजू ठेहट याला यमसदनी धाडले. त्यानंतर मनदीप तुफान, मनमोहन मोहना, टिल्लू ताजपुरिया, सुक्खा दणके, दीपक मान आणि आता गोगामेडी यांचा नंबर लागला. प्रत्येकवेळी सोशल मीडियावर गुंडांची पोस्ट पडत राहिली. थेट दिल्ली न्यायालयात न्यायाधीशांसमोर आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या आरोपीवर वकील बनून आलेल्या गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली.
गोगामेडी यांनी मागितले होते पोलिस संरक्षण, पण...
दहा महिन्यांपूर्वी राजस्थान सरकारला बिश्नोई गँगच्या संपत नेहरा या गुंडाने गोगामेडी हत्येचा कट रचल्याचे इनपुट दिले होते, असेही म्हटले जात होते. त्यामुळेच की काय, गोगामेडी यांनी पाच महिन्यांपूर्वी आपल्याला पोलिस संरक्षण मिळावे यासाठी अर्ज केला होता. तो धूळ खात पडल्याने गोगामेडी यांनी खासगी सुरक्षा पदरी बाळगली होती, जी हत्या रोखण्यात कुचकामी ठरली. आज गुंडांच्या टोळ्या एकमेकांच्या नरडीचा घोट घेत आहेत. उद्या त्यांच्या बंदुका सर्वसामान्य नागरिकांकडे वळायला फारसा वेळ लागणार नाही. म्हणूनच या गँगवॉरची तेथील सरकारने गंभीरपणे दखल घ्यायला हवी.
गोगामेडी यांचे गोदाराच्या टोळीशी कुठे बिनसले?
गोगामेडी यांची पार्श्वभूमी वादग्रस्त होती. संघटनेचे काम करतानाच ते जमिनीचे व्यवहार करत होते. त्यातून रोहित गोदाराच्या मर्जीतील गुंडांशी त्यांचे बिनसले होते.
अर्थात, सगळ्याच टोळ्या राजकीय हितसंबंध राखून आल्याने या सूडनाट्याला राजकीय रंगही आहे. गोगामेडी यांच्या हत्येला मावळते गेहलोत सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांनी उत्तर प्रदेशातून हाकलून देण्यात आलेले गुंड राजस्थानात हैदोस घालत असल्याचे म्हणत गुंडगिरीत प्रांतिकवाद आणला आहे.
५,२०० इतकी कैद्यांची क्षमता असलेल्या तिहार तुरुंगात आजमितीस तेरा हजार कैदी डांबण्यात आले असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे तिथे कोणाकोणाला सुरक्षा द्यायची, हा प्रश्न तुरुंग प्रशासनासमोर आहे.