Ranveer Allahbadia lawyer Abhinav Chandrachud: यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया कॉमेडियन समय रैनाच्या स्टँड-अप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये आई वडिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधान केलं. त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी दिलासा मिळावा यासाठी रणवीर अलाहाबादियाने अधिवक्ता अभिनव चंद्रचूड यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने अलाहाबादियावर ताशेर ओढले. दुसरीकडे, अधिवक्ते अभिनव चंद्रचूड यांनी एका प्रकरणाचा हवाला देत अलाहाबादियाची बाजू मांडली.
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी रणवीर अलाहाबादियाला चांगलेच खडसावले. त्याच्या मनात घाण भरली आहे, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. रणवीरला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले. यासोबतच त्याच्या अटकेवरही बंदी घालण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील अभिनव चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयात रणवीर अलाहाबादियाची बाजू मांडली. मात्र डॉ. अभिवन चंद्रचूड यांनी मलाही त्या भाषेचा तिरस्कार वाटल्याचे म्हटलं.
रणवीर अलाहाबादियाला जीवे मारण्याच्या धमक्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर यांच्या खंडपीठासमोर रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीला ॲडव्होकेट चंद्रचूड म्हणाले की, "रणवीर अलाहाबादियाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याची जीभ कापणाऱ्यास ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं एका कुस्तीपटूने म्हटलं आहे. रुग्ण असल्याचे भासवून लोक त्याच्या आईच्या क्लिनिकमध्ये घुसले आहेत आणि तिला धमकावले आहे."
मला वैयक्तिकरित्या याचा राग आलाय - अभिनव चंद्रचूड
यावर न्यायमूर्ती कांत यांनी, तुम्ही त्यांनी वापरलेल्या भाषेचा बचाव करत आहात का? असा सवाल केला. त्यावर बोलताना "न्यायालयाचा अधिकारी असल्याने मला वापरलेल्या भाषेची चीड आली आहे. मला वैयक्तिकरित्या याचा राग आलाय. पण ती फौजदारी गुन्ह्याच्या पातळीपर्यंत जाते का हा वेगळा प्रश्न आहे," असं चंद्रचूड म्हणाले.
"रोज धमक्या येत असतात"
यावेळी अधिवक्ता चंद्रचूड यांनी एका आरोपीला ॲसिड हल्ल्याच्या धमक्या येत आहेत असं म्हटलं. त्यावर कोर्टाने, ठीक आहे, रोज धमक्या येत असतात. सरकार कोणतीही कारवाई करू शकते, असं म्हटलं. यावर चंद्रचूड यांनी जीभ कापण्याची धमकी मिळत असल्याचे म्हटल्यावर कोर्टाने, 'मग काय झालं? लोकप्रियता मिळवण्यासाठी तुम्ही अशा गोष्टी बोललात आणि आता त्यामुळेच धमक्या मिळत आहेत,' असं म्हटलं.
रणवीर अलाहाबादियाविरोधात दोन गुन्हे
दरम्यान, अलाहाबादिया विरोधात फक्त दोन एफआयआर असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. "दोन किंवा तीन एफआयआर असतील तर तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. एकदा तुम्ही अनेक एफआयआरमध्ये अडकलात की तुम्हाला स्वतःचा बचाव करणे कठीण होते. या प्रकरणात न्यायालयाने तुमचे संरक्षण केले पाहिजे, पण केवळ फिर्यादी सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतात, तर कोर्ट अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकते का, हे मला जाणून घ्यायचे आहे," असं खंडपीठाने म्हटलं.