नवी दिल्ली: वकिलांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी राजधानी दिल्लीतील शेकडो पोलिसांनी दिल्लीतील पोलिस मुख्यालयाबाहेर सुरू केलेले आंदोलन अखेर 11 तासांनंतर मागे घेण्यात आले आहे होते. त्यानंतर आज दिल्लीतील वकिलांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
दिल्लीतील वकील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. तसेच या आंदोलन दरम्यान एका वकिलाने रोहिणी कोर्टाच्या इमरतीच्या छतावर चढून आत्महत्येचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र काही वेळानंतर त्या वकिलाला इमारतीवरुन खाली उतरविण्यात यश आलं. या आंदोलनासोबतच दिल्लीमधील पाच जिल्हा न्यायालयांच्या वकिलांनी कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
उत्तर दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी दुपारी काही पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण ऐवढे वाढले की पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. ज्यानंतर वकिलांनी पोलिसांच्या गाडीला पेटवून दिली. या ठिकाणी झालेल्या हाणामारीत आणि गोळीबारात काही जण जखमीही झाले होते. तीस हजारी कोर्टाच्या लॉक अपमध्ये वकिलाला जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.