- बलवंत तक्षक
चंदीगड : आरोपीला जामीन मिळण्यासाठी वकील न्यायालयात जाणे यात वेगळे काही नाही; परंत एक वकील आदल्या रात्री लग्न करतो व तो पत्नीला सोबत घरी घेऊन न जाता आरोपीला जामीन मिळण्यासाठी न्यायालयात हजर राहतो तेव्हा तो वेगळा ठरतो. पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हे समजते तेव्हा त्यांनी वकील लुपिल गुप्ता यांची प्रशंसा केली.गुन्ह्याच्या एका प्रकरणात आरोपी अंग्रेज सिंह याचे गुप्ता हे वकील आहेत. रात्री गुप्ता यांचे लग्न झाले व दुसऱ्या दिवशी न्यायालयात तारीख ठरलेली होती. गुप्ता यांनी पत्नीच्या आई-वडिलांना सांगितले की, नवरीचा निराेप समारंभ थांबवला जावा म्हणजे मला न्यायालयात हजर राहता येईल. परवानगी मिळताच गुप्ता वकिलाचे कपडे अंगावर चढवून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायमूर्ती अरुण मोंगा यांच्यासमोर हजर झाले. प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यावर सरकारी वकील पी. एस. वालिया यांनी उत्तर दाखल करण्यासाठी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. गुप्ता म्हणाले, प्रकरण दाखल झाले त्याला एक वर्ष पाच महिने झाले; परंतु पोलिसांनी अजून चालानही सादर केलेले नाही.