नितीन नायगावकर
नवी दिल्ली - गेली २५ वर्षे दिल्लीच्याहिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला. लक्ष्मण राव यांच्या ४० वर्षांच्या साहित्य संपदेत ‘मानविकी हिंदी साहित्य’ ग्रंथाच्या निमित्ताने आणखी एकाची भर पडली आहे. एका चहावाल्याची यशोगाथा भारताला तोंडपाठ असली तरीही जगभरातील हजारो वाचकांना या चहावाल्या लेखकाची पुस्तके तोंडपाठ आहेत.
लक्ष्मण राव अमरावतीच्या तळेगाव दशासरचे. गिरणीतील नोकरी गेल्यामुळे १९७५ मध्ये दिल्ली गाठणारे राव यांनी पहिली चार वर्षे विस्थापितांसारखी काढली. जिद्द असून उपयोग नव्हता, कारण हाती पैसा नव्हता. शेवटी आयटीओ येथील हिंदी भवनाच्या परिसरातच पान-बिडीची टपरी सुरू केली. त्यावर कसाबसा उदरनिर्वाह करून १५ वर्षांनी सुरू केलेली चहाची टपरी आजही आहे.मुन्शी प्रेमचंद, शरदचंद्र चटोपाध्याय आदींची पुस्तके वाचल्यावर, शब्दकोषांचा अभ्यास केल्यावर हिंदी भाषा व साहित्यावर संशोधन आवश्यक असल्याचे त्यांना वाटले. त्यातून सुरू झालेल्या लिखाणातूनच ‘मानविकी हिंदी साहित्य’ची निर्मिती झाली.
सकाळी लेखन, वाचन; नंतर चहाची टपरी
एक मुलगा अकाऊंटंट आणि एक बँकेत आहे. ती घरखर्च सांभाळतात; पण ज्या जागेने माझ्यातील लेखक जागवला ती जागा सोडवत नाही म्हणून चहा विकतो,’ असे लक्ष्मण राव सांगतात.
७२० पानी ग्रंथाच्या ४० प्रतींची विक्री टपरीच्या बाजूला लावलेल्या छोट्या स्टॉलवरून व ऑनलाईन झाली. लवकरच त्यांचे ‘बॅरिस्टर गांधी’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. रोज सकाळी पाच-सहा तास लेखन-वाचन आणि दुपारी तीनपासून रात्री नऊपर्यंत चहाची टपरी चालवतात. पुस्तकांच्या विक्रीतून माझा खर्च निघतो. राष्ट्रपतींकडून कौतुक झाले, कित्येक पुरस्कारही मिळाले, देश-विदेशातील माध्यमांनी डोक्यावर घेतले. याचे मोल आहेच; पण चहा टपरीचे मोल कदाचित थोडे जास्तच आहे.
जिद्दीचा प्रवास
चहाचा व्यवसाय करतानाच लक्ष्मण राव यांनी एमए पूर्ण केले. हिंदी साहित्यिकांचे ग्रंथ वाचून काढले. त्यातूनच लिखाणाची प्रेरणा मिळून २५ पुस्तके प्रकाशित झाली. सुरुवातीला एका प्रकाशकाने ‘गेट आऊट’ म्हटले आणि राव यांनी स्वत:चीच प्रकाशन संस्था सुरू केली. हौसेपोटी लिखाण केले नाही, तर पुस्तकविक्रीचा मार्गही शोधला. त्यांच्या कथा, नाटके सत्यघटनांवर आधारित आहेत.