Laxmi Ganesh photos on currency notes: भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच भगवान श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी AAP चे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. त्यामुळे गुजरात निवडणुकीपूर्वी (Gujarat Elections) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याची चर्चा आहे. नोटांवर एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी गणेशजींचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपली अर्थव्यवस्था रूळावर येईल, असे 'लॉजिक' केजरीवाल यांनी मांडले.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "देवी लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते. त्याचबरोबर भगवान श्रीगणेश सर्व अडथळे दूर करतात, ते विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे या दोघांच्या फोटोंचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. यामुळे आपली अर्थव्यवस्था सुधारेल. आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही, पण किमान नवीन नोटा छापल्या जातात त्यावर ही सुरुवात केली जाऊ शकते आणि हळूहळू नवीन नोटा चलनात येतील."
"स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली, तरीही देश विकसनशील आणि गरीब देश का मानला जातो? भारताने विकसित देश व्हावे आणि एक समृद्ध देश म्हणून ओळख लवकरात लवकर मिळवावी अशी आपली सर्वांचीच इच्छा आहे. प्रत्येक भारतीय आणि भारतातील प्रत्येक कुटुंबाने एक श्रीमंत कुटुंब बनले पाहिजे अशी आपली सर्वांची इच्छा आहे. आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक टप्प्यात आहे. आपण सर्वजण ही गोष्ट पाहत आहोत. डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याचे आपण पाहत आहोत. या सगळ्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. यात सुधारणा करण्यासाठी मी केंद्र सरकारला मोठा निर्णय घेण्याचे आवाहन करतो. या सुधारणेसाठी पावले उचलावी", अशी विनंती व मागणी केजरीवाल यांनी केली.