शुद्ध शाकाहारी माणसाला जेवणाचा अचानक मांसाहरी पदार्श मिळाल्यास काय होईल, तर नक्कीत त्या व्यक्तीचा राग अनावर होईल. मांसाहाराचे सेवन न केलेल्या अशा व्यक्तींना चुकीच्या पद्धतीने हॉटेल, किंवा इतर फूड सर्व्हिसेसमधून अशी मेजवाणी आल्यास निश्चितच त्यांच्याकडून संताप व्यक्त होईल. रेल्वे प्रवासात किंवा विमानप्रवासातून प्रवास करत असताना संबंधित यंत्रणेकडून प्रवासी जेवण मागवतात. त्यावेळी, अदलाबदलीतून अशा घटना घडतात. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले.
एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने शाकाहारी जेवण मागवले होते. त्यांस ऑर्डरप्रमाणे शाकाहारी जेवणही मिळाले, पण याच जेवणात चिकनचे दोन पीस (तुकडे) आढळल्यामुळे या प्रवाशाने संताप व्यक्त केला आहे. प्रवाशाने ट्विटरवरुन फोटो शेअर करत यासंदर्भात आपली तक्रार केली. एअर इंडियाच्या कालीकट ते मुंबई प्रवासादरम्यान ही घटना घडली. वीरा जैन नावाच्या महिला प्रवाशासोबत ही घटना घडली. वीरा जैनने ट्विटरवरुन आपली दु:खद यात्रा सांगितल्यानंतर एअर इंडियानेही त्यांच्या ट्विटला रिप्लाय देत बाजू मांडली.
वीरा जैन यांना शाकाहारी लेबल असेललं जेवण देण्यात आलं होतं. मात्र, याच जेवणात चिकनचे तुकडे आढळून आले. आधीच १ तास उशिराने ह्या फ्लाईटचे उड्डाण झाल्यामुळे प्रवासी संतप्त होते. त्यात, वीरा जैन यांना अस मनस्ताप सहन करावा लागला. वीरा जैन यांनी ट्विटरवरुन टाकलेल्या फोटोमध्ये स्पष्टपणे जेवणावर शाकाहारी असं लेबल लागल्याचं दिसून येत आहे. वीरा यांनी यासंदर्भात विमानातील सुपरवायजरशी संपर्क साधून माहिती दिली. त्यावेळी, प्रशासनाने त्यांची सूचना ऐकून घेत माफीही मागितली.
दरम्यान, एअर इंडियाने प्रवासी वीरा जैन यांना हे ट्विट डिलीट करण्याची विनंती केली. तुमच्या पीएनआर नंबरसह आमच्या डीएममध्ये मेसेज करावा, असे आवाहनही एअर इंडियाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहे.