मुंबई- कामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं आहे. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. तसेच बाळासाहेबांप्रमाणे त्यांनीही मुंबई बंद पाडून दाखवली होती. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई बंदची हाक दिल्यावर मुंबई पूर्णतः ठप्प व्हायची.जॉर्ज यांची टॅक्सी चालक-मालक संघटना होती. तसेच मुंबईतील वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या बेस्टमध्येही त्यांची युनियन होती. महापालिकेतील कामगार वर्ग आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना जॉर्ज यांनी संघटित केले होते. जॉर्ज यांच्या सर्वांना सामावून घेण्याच्या व्यक्तिमत्त्वामुळेच सर्वच क्षेत्रातील कामगार त्यांच्या पाठीशी होते. जॉर्ज यांच्या राजकीय बंदलाही या सगळ्या कामगार संघटना पाठिंबा देत मुंबई ठप्प करायच्या. तसेच ट्रेन बंद पाडण्यासाठी तेव्हा जॉर्ज यांचे कार्यकर्ते रुळांवर उतरून आंदोलन करायचे. विशेष म्हणजे जॉर्ज फर्नांडिस स्वतःही त्या आंदोलनाचं नेतृत्व करायचे. दादर स्थानकात रेल्वे रुळांवर उतरलेल्या जॉर्ज यांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी एकदा लाठीचार्ज केला होता. परंतु जॉर्ज यांच्याबरोबर असलेले कामगार आणि सहकारी पोलिसांच्या लाठ्याकाठ्यांना कधीही घाबरले नाहीत. त्यामुळे कार्यकर्तेही जोशात असायचे. पुढे जॉर्ज यांनी बिहारमध्ये बस्तान बसवलं आणि त्याच काळात शिवसेनेचा उदय झाला. शिवसेनेची राडा संस्कृती मराठी वस्त्यांतील बेकार तरुणांमध्ये लोकप्रिय होत होती. गिरणगावातील कम्युनिस्टांचे गड सेनेने राडे करून मोडून काढले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावर हे तरुण आक्रमक होत हल्लाबोल करायला तयारच असायचे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई बंदचा इशारा दिला की मुंबई ठप्प होत असे.
बाळासाहेबांसारखीच एका झटक्यात 'मुंबई बंद' करण्याची ताकद असलेला नेता!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 10:29 AM
एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई बंदची हाक दिल्यावर मुंबई पूर्णतः ठप्प व्हायची.
ठळक मुद्देकामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं आहे. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई बंदची हाक दिल्यावर मुंबई पूर्णतः ठप्प व्हायची.