Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज(दि.8) असाम (Assam) आणि मणिपूरचा (Manipur) दौरा केला. त्यांच्या या या दौऱ्याची सुरुवात सिलचर येथून केली. येथे त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली अन् थलाई येथील मदत शिबिरांची पाहणी केली. आसाम दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राहुल गांधींना निवेदन सादर करुन आसाममधील बारमाही पुराचा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती केली.
असामचा दौरा झाल्यानंतर राहुल गांधींनी मणिपूर येथील जिरीबाम उच्च माध्यमिक विद्यालयातील मदत शिबिराला भेट दिली. यानंतर त्यांनी इंफाळच्या मदत छावण्यांमध्येही पाहणी केली. आता सायंकाळी ते मणिपूरच्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. याशिवाय पक्षाच्या नेत्यांनाही भेटणार असून, लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मणिपूरच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.
राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी या भागात गोळीबारराहुल गांधी यांचा हा तिसरा मणिपूरचा दौरा आहे, तर विरोदी पक्षनेते झाल्यानंतरचा पहिला आहे. दरम्यान, राहुल गांधी मणिपूरला पोहोचण्यापूर्वी आज पहाटे 3.30 वाजता जिरीबाममध्ये जोरदार गोळीबार झाला. सुमारे 3.30 तास हा गोळीबार सुरू होता. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
आसाममध्ये पूर आणि पावसामुळे आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू दरम्यान, आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. 29 जिल्ह्यांमध्ये एकूण 23 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. निमतीघाट, तेजपूर, गोलपारा आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. त्याच्या उपनद्याही अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. पुरामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.