नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अन्य नेते राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी जाण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली. अटक आणि ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांत सरचिटणीस प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल, आनंद शर्मा, अजय माकन, के. सुरेश, जयराम रमेश, कुमार शैलजा, रणदीप सिंग सुरजेवाला, एच. के. पाटील, पवन कुमार बन्सल, विवेक बन्सल, राजीव सातव, कुलजीत नाग्रा, डॉ. चेला कुमार, भक्त चरण दास, देवेंदर यादव, मनीष चत्रथ, दीपेंदर सिंग हुडा, कुलदीप बिष्णोई, सुनील जाखड, गोविंद सिंग दोतासरा, सयद नासीर हुसैन, प्रदीप तमटा, सुष्मिता देव आणि इतरांचा समावेश आहे. नंतर सर्वांची सुटका करण्यात आली.
...तर त्यांनाही अतिरेकी ठरवतील -राहुल गांधी तीनही कृषी कायदे सरकार जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलक शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन सोपवून परत आल्यानंतर ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी टीका ऐकण्यासाठी तयार नाहीत. जो कोणी त्यांच्या विरोधात उभा होतो त्याला अतिरेकी ठरविले जाते. मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत का असेनात. जर तेही त्यांच्याकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करतील तर मोदी त्यांनाही अतिरेकी ठरवतील.