राजेंद्र कुमार
लखनौ : अयोध्येत जमीन खरेदी-विक्रीचा खुलेआम काळाबाजार सुरू आहे. भाजपचे नेते आणि अधिकारी तेथील जमीन लुटत आहेत, तर दुसरीकडे अयोध्येतील गरीब शेतकरी आपल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी भटकत आहेत. योगी सरकारच्या काळात पोलिस जात पाहून एन्काउंटर करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लखनौ येथे केला आहे.
अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर निशाणा साधत म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत आणि आसपास मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करण्यात आली आहे. भाजप नेते आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने अयोध्येत लष्कराची जमीनही विकण्यात आली. भाजपच्या नेते, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत.
चकमकीवेळी पोलिसाने चप्पल का घातली?
यूपीमध्ये एन्काउंटरसाठी खोट्या कथा रचल्या जात आहेत. मंगेश यादव यांची हत्या करण्यात आली. त्यांना घरातून उचलून नेण्यात आल्याचे सर्वांना माहिती आहे. चकमकीच्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसाने चप्पल घातली होती. उत्तर प्रदेशात खोटे एन्काउंटर होत आहेत. राज्य सरकारने यूपीला बनावट चकमकींचे केंद्र बनवले आहे, असा आरोप त्यांनी केला.