चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील नेत्यांनाही टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:34 AM2023-10-10T10:34:23+5:302023-10-10T10:34:50+5:30
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांशी महाराष्ट्रातील नेत्याची जवळीक राहिली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणूक होत असलेल्या पाचपैकी चार राज्यांमधील निवडणुकीचे टेन्शन भाजप - काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनाही राहणार आहे. दोन्ही पक्षांचे राज्यातील बडे नेते प्रचारात दिसतील. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांशी महाराष्ट्रातील नेत्याची जवळीक राहिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणामध्ये जाऊ आले आहेत. निवडणूक रणनीती व उमेदवार निश्चित करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे ते सदस्य आहेत. ते प्रत्यक्ष प्रचारासाठीही जाणार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी आहेत. त्यामुळे तेथील निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आठ नेत्यांवर या आधीच तेलंगणामध्ये जिल्हानिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेस व भाजप यांच्याकडून स्टार प्रचारकांची यादी लवकरच जाहीर होईल, त्यात महाराष्ट्रातील निवडक नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
या नेत्यांवर दिली जाईल जबाबदारी - भाजपकडून देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांवर विशेष जबाबदारी दिली जाईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदींना प्रचार यंत्रणेत महत्त्वाचे स्थान असेल असे मानले जाते.