नवी दिल्ली : वयाची साठी ओलांडल्यानंतर राजकीय नेत्यांनी राजकारणातून स्वत:हून निवृत्त होत समाजसेवा करावी, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना संबोधून शहा यांनी हा टोला लगावल्याचे मानले जात असतानाच, आपण असे काहीही म्हटलेच नसून आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा शहा यांनी केला आहे.बिहार निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले होते. निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा असा आग्रह धरत लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पक्षातील बहुतेक साठी ओलांडलेल्या नेत्यांनी मोदी व शहांना लक्ष्य करीत घणाघाती टीकेचा वार केला होता. शनिवारी चित्रकुट येथे स्वामी रामभद्राचार्य यांची भेट घेतल्यानंतर अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक नानाजी देशमुख यांचा दाखला घेत, अप्रत्यक्षपणे पक्षातील ज्येष्ठांना लक्ष्य केले. नानाजी देशमुख यांनी साठी ओलांडल्यानंतर राजकीय संन्यास घेऊन सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. राजकीय नेत्यांसाठी नानाजी देशमुख एक आदर्श उदाहरण ठरावेत. राजकारण्यांनी साठी ओलांडल्यानंतर राजकारण सोडून सामाजिक सेवा करावी, असे शहा म्हणाले. अर्थात या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसताच ते सारवासारव करताना दिसले.
साठीनंतर नेत्यांनी राजकारण सोडावे
By admin | Published: November 16, 2015 12:15 AM