नवी दिल्ली : इशरत जहाँ ही ‘लष्कर’ची अतिरेकी होती, असा दावा अमेरिकी नागरिक डेव्हिड हेडली याने केल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालेले असताना या वादात आता माजी विशेष आयबी प्रमुख राजेंद्रकुमार यांनी उडी घेतली आहे.इशरत जहाँ चकमक ‘बनावट’ ठरवून त्यात आपल्याला अडकवणाऱ्या एका ज्येष्ठ सीबीआय अधिकाऱ्याविरुद्ध आणि काँग्रेसमधील बड्या पुढाऱ्यांविरुद्ध आपण सरकार आणि न्यायालय यांच्याकडे दाद मागणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, ज्यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी आपण अधिकाधिक माहिती मिळवीत आहोत. या प्रकरणी मी सरकार आणि न्यायालयात दाद मागण्यासाठी माझ्या कायदे सल्लागारांशी विचारविनिमय करीत आहे. माझ्या तक्रारीत मी केवळ दोषी सीबीआय अधिकाऱ्याचेच नाव घेणार आहे असे नव्हे, तर अशा अधिकाऱ्यांचा शस्त्र म्हणून वापर करून या घटनेला राजकीय रंग देणाऱ्या काँग्रेसमधील बड्या नेत्यांचाही उल्लेख करणार आहे. इशरत जहाँ आणि तिच्या साथीदारांना ठार मारण्यासाठी गुजरात पोलिसांनी ‘बनावट चकमक’ घडवून आणली आणि त्यात गुप्तचर खात्यानेही सहकार्य केले, असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. ही घटना घडली त्यावेळी राजेंद्रकुमार आय. बी. च्या गुजरात विभागाचे प्रमुख होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)