नवी दिल्ली : भारतीय संसदीय पक्षाची शनिवारी फेररचना करण्यात आली असून लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहातील पक्षाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
गृहमंत्री राजनाथ सिंग भाजपाचे लोकसभेतील उपनेते असतील तर वित्त व संरक्षणमंत्री अरुण जेटली राज्यसभेतील उपनेते असतील.
भाजपा संसदीय पक्षाच्या पुनर्रचित कार्यकारिणीत सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याखेरीज दोन्ही सभागृहांसाठीही स्वतंत्र मुख्य प्रतोद नेमण्यात आले आहेत.
याशिवाय पक्षाने लोकसभेसाठी 13 तर राज्यसभेसाठी तीन प्रतोद नेमले आहेत. त्यानुसार राजस्थानमधून निवडून आलेले अजरुन राम मेघवाल पक्षाचे लोकसभेतील तर पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आलेले अविनाश राय खन्ना त्या सभागृहातील पक्षाचे मुख्य प्रतोद असतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री संतोष गंगवार लोकसभेतील व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर राज्यसभेतील पक्षाचे मुख्य उपप्रतोद असतील. लोकसभेत नेमलेल्या 13 प्रतोदांमध्ये महाराष्ट्रातून अकोला मतदारसंघातून निवडून आलेले संजय धोत्रे यांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशचे सदस्य गणोश सिंग व राजस्थानमधील भुपेंद्र सिंग हे पक्षाचे अनुक्रमे लोकसभा व राज्यसभेतील चिटणीस असतील. कर्नाटकमधील पी. सी. मोहन हे भाजपा संसदीय पक्षाचे नवे खजिनदार असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)