नवी दिल्ली : भूसंपादन विधेयक आणि धर्मनिरपेक्षतासारख्या मुद्यांवर संसदेत काँग्रेससोबत आघाडी स्थापन करण्याची माकपची तयारी आहे. मात्र, संसदेबाहेर कोणत्याही राष्ट्रीय आघाडीत आम्ही सहभागी होणार नाही. कारण ते विश्वासार्ह ठरणार नाही, अशी स्पष्टोक्ती माकपचे नवनिर्वाचित सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिली.बिहारमधील येत्या विधानसभा निवडणुका भाजपविरोधी पक्षांसाठी कठोर परीक्षा असेल. जनता परिवाराच्या विलीनीकरणाचा परिणाम काय होणार याची प्रतीक्षा करून डावपेच आखावे लागतील, असेही ते म्हणाले. अलीकडेच सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात भूसंपादन विधेयकाविरुद्ध संसदेवर नेण्यात आलेल्या ‘मार्च’मध्ये माकपचा सहभाग होता. माकप सर्वप्रथम स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करील, असे ते मुलाखतीत म्हणाले.आम्ही भूसंपादनसारख्या मुद्यावर संसदेत एकजूटता दाखवू. हे विधेयक जनता आणि देशाच्या हिताचे नाही, असे आम्हाला वाटते. सध्या संसदेबाहेर अनेक प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्यायोग्य स्थिती निर्माण झालेली नाही. अशा आघाडीकडे पर्यायी धोरण असायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांची प्रशंसाभूसंपादन विधेयकावर राहुल गांधींनी अलीकडे छेडलेली मोहीम चांगली आहे. तथापि, सध्या काँग्रेसकडे सुसंगत नेतृत्व नाही. सध्या आम्हाला महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रतीक्षा करावी लागेल, असेही येचुरी म्हणाले. व्यवहार्य राजकारण ही येचुरी यांची विशेष ओळख मानली जाते. वस्तू आणि सेवाकर विधेयक आणि श्रम कायद्यातील सुधारणांवर सरकार भर देत आहे. संयुक्तरीत्या रणनीती आखण्याची ही संधी असू शकते.निवडणुका दूर असल्यामुळे काँग्रेससोबत संसदेबाहेर आघाडी स्थापन करण्याला नकार आहे काय? यावर ते म्हणाले की, निवडणुकांना आणखी चार वर्षे वेळ आहे, पण देशासाठी उत्तम असे धोरणात्मक पर्याय कोणते आहेत? त्याबाबत सहमती नाही. इतिहासाचा अनुभव काय सांगतो. आम्ही २००९ मध्ये धर्मनिरपेक्ष पर्याय देण्याचा नारा दिला असताना आमच्यावर टीका झाली.(लोकमत न्यूज नेटवर्क)