ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १२ - वा-याच्या वेगाशी स्पर्धा करु पाहणारी भारतातील आघाडीची महिला बाईकर वीणू पालीवालचा तिच्या लाडक्या हार्ले डेव्हीडसन बाईकवरुन झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी मध्यप्रदेशच्या विदीशा जिल्ह्यात भरवेगातील बाईक घसरल्याने हा अपघात झाला.
वीणू तिच्या हार्ले डेव्हीडसन बाईकवरुन नॅशनल टूरवर निघाली होती. या टूरमध्ये दीपेश तन्वर तिच्यासोबत होता. जयपूरची रहिवाशी असणारी वीणू ४४ वर्षांची होती. सोमवारी सकाळी लखनऊवरुन निघाल्यानंतर ती भोपाळच्या दिशेने जात असताना तिच्या बाईकला अपघात झाला. ग्यारासपूरमध्ये वीणूची बाईक रस्त्यावरुन घसरली.
तिला सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर विदीशा जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वीणू तिची हार्ले डेव्हीडसन बाईक ताशी १८० किमी वेगाने चालवायची. देशभरातील मोटरबाईक प्रवासावर डॉक्युमेंट्री करण्याची तिची इच्छा होती.
वीणूच्या जयपूर, इंदूर आणि मुंबईमधील मित्रांना तिच्या अपघाताची माहिती देण्यात आली. वीणू कॉलेजमध्ये असताना मित्रांकडून बाईक चालवायला शिकली होती. पण स्वत:ची बाईक नसल्यामुळे तिला सतत बाईक चालवता येत नसे.
लग्नानंतर तिला नव-याने बाईक चालवण्याची परवानगी दिली नव्हती. मागच्यावर्षी तिचा घटस्फोट झाला. वीणूला दोन मुले आहेत. एका मुलाखतीत वीणूला बाईक चालवणा-यांना काय संदेश देशील असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने सुरक्षित वाहन चालवा असा सल्ला दिला होता. तिला लेडी ऑफ द हार्ले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.