नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलवर तुर्कीच्या विमानातून आलेल्या मालातून किरणोत्सर्गी पदार्थांची गळती होत असल्याचे वृत्त शुक्रवारी सकाळी धडकताच खळबळ उडाली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या चमूने (एनडीआरएफ) लगेचच विमानतळावर पोहचून गळती रोखली. त्यानंतर अणुऊर्जा विभागाचा चमूही दाखल झाला. टीव्ही वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज झळकताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनीही पत्रपरिषदेत गळती थांबविण्यात आल्याचा दावा केला, मात्र संपूर्ण यंत्रणा हादरवून सोडणारा तो पदार्थ औषधासाठी वापरात येणारा कार्बनयुक्त तरल पदार्थ (आॅर्गनिक लिक्विड) असल्याचा खुलासा अणुऊर्जा नियामक मंडळाने(एईआरबी) केला आहे.दुसऱ्या एका कंटेनरमधील तरल पदार्थ अणुऔषध असलेल्या पॅकेजवर सांडल्यामुळे किरणोत्सर्गी पदार्थांची गळती होत असल्याचा संशय व्यक्त होऊन तशी बातमी कर्णोपकर्णी झाली होती. या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता कार्बनयुक्त तरल पदार्थ सांडल्यामुळे तुर्किश विमानातील कंटेनरमधून गळतीचा भास झाला, असे एईआरबीचे उपाध्यक्ष आर. भट्टाचार्य यांनी नंतर स्पष्ट केले. तत्पूर्वी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलवर पहाटे तुर्कीवरून आलेल्या किरणोत्सर्गी पदार्थांची गळती होताच एकच खळबळ उडाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)४नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए)या नियामकाने रेडिओधर्मी पदार्थांच्या गळतीप्रकरणी चौकशी सुरू केल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते. हवाई सुरक्षा संचालकांच्या नेतृत्वातील एका चमूकडून तपास करण्यात आला. इस्तंबूलहून आलेल्या टीके-७१६ या तुर्कीश एअरलाईन्सच्या विमानातून सोडियम आयोडाईड आणि सोडियम मॉलिबडेट या तरल पदार्थांची गळती झाल्याचा संशय होता. प्रत्यक्षात या विमानाच्या कंटेनरमधून गळती झालीच नाही.हे विमान पहाटे ४.३२ वाजता उतरले मात्र सकाळी ९ वाजता गळती होत असल्याचा संशय आला. त्यानंतर कार्गो परिसराची पूर्णपणे नाकेबंदी करण्यात आल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले होते.
‘त्या’ गळतीने दिल्लीत खळबळ
By admin | Published: May 30, 2015 12:10 AM