लखनऊ - उत्तर प्रदेशच्या आगर-लखनऊ एक्सप्रेस वे वर भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानांचा जो सराव सुरु आहे त्यामध्ये C-130J हर्क्युलिस विमानाचे लँडिंग आणि उड्डाण मुख्य आकर्षण होते. महाकाय आकारमानाचे C-130J हे लष्करी मालवाहतूक विमान आहे. एक्सप्रेस वे च्या छोटयाशा धावपट्टीवर इतक्या मोठया विमानाचे लँडिंग एक चॅलेंज होते. पण भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केले.
सध्या भारतीय हवाई दलाकडे सहा C-130J हर्क्युलिस विमाने आहेत. भारताने अमेरिकेकडून ही विमाने विकत घेतली असून, लॉकहीड मार्टिन कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. या सहा विमानापैंकी दोन विमाने बक्क्षी का तालाब विमानतळावर तैनात असतात. चार अत्याधुनिक टरबोप्रॉप इंजिन असलेले हे विमान हवाई दलाची पहिली पसंत आहे.
कारण वेगवेगळया मोहिमांमध्ये हे विमान प्रचंड उपयुक्त ठरु शकते. हर्क्युलिसमध्ये हवेतच दुस-या विमानांमध्ये इंधन भरण्याची क्षमता आहे. 2008 मध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पहिले हर्क्युलिस विमान दाखल झाले. हवाई दल भविष्यात आणखी हर्क्युलिस विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. हे विमान अनेक सुविधांनी सुसज्ज आहे. जंगलात पेटलेला वणवा विझवण्यासाठी पाणी मारण्याची खास व्यवस्था या विमानात आहे तसेच युद्धकाळात मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा, दारुगोळा, बॉम्ब या विमानातून वाहू नेता येऊ शकतात. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगातही मदत आणि बचावकार्यात हे विमान प्रचंड उपयुक्त आहे.
मंगळवारी सकाळी C-130J हर्क्युलिस विमानाच्या लँडिंगनेच सरावाला सुरुवात झाली. विमान एक्सप्रेस वे वर उतरल्यानंतर सर्वात प्रथम एअर फोर्सचे गरुड कमांडो विमानातून बाहेर आले व त्यांनी धावपट्टीचा ताबा घेतला. त्यानंतर मिराज 2000, जॅग्वार, सुखोई 30 ही विमाने धावपट्टीवर उतरली. लँडिंग करताना फायटर विमाने काही सेकंदांसाठी धावपट्टीवर उतरली व लगेच पुन्हा उड्डाण केले.
युद्धाच्या काळात रनवे काही कारणाने मिळत नसेल तर अशावेळी एक्सप्रेस वे महत्वाचा असेल त्यामुळे हा सराव खूप महत्वाचा आहे असे हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एस बी देव म्हणाले. याआधी हाय वे वर आम्ही मिराज विमाने उतरवली होती. सरकारने ही बाब खूप गांर्भीयाने घेतल्याने मी आनंदी आहे. प्रत्येक नवीन हायवेवर रनवेची सुविधा असली पाहिजे असे देव म्हणाले.