मुंबई - आज २ ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची 148 वी जयंती. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख असून आजचा हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला आहे. सर्व धर्म समभाव, हिंदुत्व व समाजवाद या तीनही विचारधारांचा योग्य समन्वय करून त्यांनी भारताला सुयोग्य अशा राष्ट्रीय तत्वज्ञानाचा पुरस्कार केला तसेच जगातील इतर देशांसाठीही अशा प्रकारच्या शांततामय सहजीवनाचे उद्दीष्ट असणार्या तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यास उद्युक्त केले. त्यांची मानवता, निसर्ग, आपला स्वतःचा धर्म यावरील श्रद्धा, जीवनातील साधेपणा व अहिंसेवरील गाढा विश्वास यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व स्थलकालातीत आदर्श बनले आहे. अहिंसक सामाजिक चळवळीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे ही त्यांच्या जीवनाची महान उपलब्धी होती. या यशामुळे अहिंसक मार्गाच्या क्षमतेला नवी ताकद मिळाली व कोणत्याही सामाजिक, आर्थिक, राजकीय वा पर्यावरणीय व्यवस्थेतील बदलासाठी ते एक प्रभावी, सर्वमान्य व विधायक साधन बनले. तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या या सात गोष्टी..कदाचीत त्या तुम्हाला माहित नसतील.
- शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी गांधीजींचे नाव पाच वेळा नोबेल समिती समोर आले होते. मात्र त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला नाही. गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांना नोबेल पुरस्कार न मिळाल्याची खंत पुरस्कार समितीने व्यक्त केली होती.
- भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजी आयुष्यभर लढले. ब्रिटिशांनी गांधीजींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले.
- महात्मा गांधी यांची अंतयात्रा ही 8 किलोमीटर लांब होती. जवळजवळ 10 दशलक्ष लोकं अंतयात्रेत सहभागी झाले होते.
- गांधीजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रसिद्ध व्यक्तींना पत्रे लिहीली आहेत. यात हिटलर, टॉल्सटॉय आणि आइन्स्टाइन यांचा समावेश आहे.
- भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या संविधान सभेत पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणादरम्यान गांधीजी उपस्थित नव्हते.
- महात्मा गांधीयांच्या मृत्यृवेळी त्यांनी परीधान केलेले कपडे आजही संग्रालयात सुरक्षीत ठेवण्यात आले आहेत.
- अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव जॉब यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा पगडा होता. गांधीजींना सन्मान देण्यासाठी म्हणून गोल फ्रेमचा चश्मा वापरत.