नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसचा समाचार घेतला आहे. संघराज्याबद्दल घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार सांगत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. सरकारं अस्थिर करणं हेच काँग्रेसचं धोरण आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना १०० वेळा लोकनियुक्त सरकारं बरखास्त करण्यात आली. मग काँग्रेसचे नेते कोणत्या तोंडानं संघराज्याची भाषा करतात, असा थेट सवाल मोदींनी उपस्थित केला.
काँग्रेसनं कोरोना काळातही राजकारण केलं. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राकडून सातत्यानं बैठका घेतल्या जात होत्या. मी अनेकदा देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली, अशा शब्दांत मोदी काँग्रेसवर बरसले.
काँग्रेसवर टीका करणाऱ्या मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं कौतुक केलं. 'मला शरद पवारांचे आभार मानायचे आहेत. हा निर्णय यूपीएचा नाही म्हणत मी जास्तीत जास्त लोकांशी बोलेन असं त्यांनी मला सांगितलं. शरद पवार, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला हजेरी लावली. संपूर्ण मानव जातीवर संकट आलं असताना तुम्ही बैठकीवर बहिष्कार टाकलात. शरद पवारांकडून काहीतरी शिका,' अशा शब्दांत पवारांचं कौतुक करताना मोदींनी काँग्रेसला सुनावलं.