ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - सर्व राज्यांनी सहमती दिल्यामुळे देशात जीएसटी लागू करण्याच मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 1 जुलैपासून देशात जीएसटी लागू होईल. सोने, चप्पल, बिस्कीट आणि कपडा या वस्तूंवर जीएसटीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. बिडीवरतीही टॅक्स लावण्यात आला असून, सिगरेटसंबंधी निर्णय 11 जुलैच्या बैठकीत होईल.
सोन्यावर 3 टक्के जीएसटी आकारण्यात येईल. मागच्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत विविध वस्तू आणि सेवांवर 5,12,18 आणि 28 टक्के कर आकारण्याचा निर्णय झाला होता. सोन्यावर 5 टक्के जीएसटी प्रस्तावित करण्यात आला होता. हि-यावरही 3 टक्के जीएसटी आकारण्यात येईल. बिडीवर सर्वाधिक 28 टक्के जीएसटी लागू होईल.
पायात घालण्याच्या 500 रुपयांपर्यंतच्या चप्पलवर 5 टक्के तर, त्यापेक्षा जास्ती किंमतीच्या चप्पलवर 18 टक्के जीएसटी लागू होईल. बिस्कीटवर 18 टक्के जीएसटी लागू होईल. सध्या बिस्कीटवर 20.6 टक्के कर आहे. रेडीमेड कपडयावर 12 टक्के जीएसटी लावण्यात येईल. धागा आणि तागावर 5 टक्के, मॅनमेड फायबरवर 5 आणि सिंथॅटीक फायबरवर 18 टक्के जीएसटी लावला जाईल. शेती संबंधीच्या सामग्रीवर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येईल.
जीएसटी ही स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वात मोठी करसुधारणा आहे. वस्तू आणि सेवांवरील विविध राज्यांचे आणि केंद्रीय कर एकत्र करुन एकसमान करआकारणी हे जीएसटीचे मुख्य उद्दिष्टय आहे. जीएसटीमुळे देशाच्या जीडीपीमध्ये 2 टक्के वाढ होईल असा अंदाज आहे. येत्या 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. आरोग्य, शिक्षण आणि विनाएसी रेल्वेप्रवास जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आला आहे. अन्नधान्य, डाळी, दूध हे पदार्थ सुद्धा जीएसटीमधून वगळयात आलेत. गोडपदार्थ, खाद्य तेल, साखर, चहा, कॉफी आणि कोळशावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येऊ शकतो.
छोटया गाडयांवर 28 टक्के जीएसटी, आलिशान गाडयांवर जीएसटी तसेच 15 टक्के उपकर लावण्यात येऊ शकतो. एसी, फ्रिज या ग्राहकोपयोगी वस्तू सुद्धा 28 टक्क्यांच्या कक्षेत आहेत. टेलिकॉम आणि वित्तीय सेवांवर 18 टक्के तर, वाहतूक सेवांवर 5 टक्के जीएसटी प्रस्तावित आहे. रेल्वेतून एसी प्रवासावर 5 टक्के जीएसटी लागू शकतो