वाराणसी - वाराणसी येथील कॅन्टॉनमेन्ट रेल्वे स्थानकाजवळ नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असताना, मंगळवारी त्याचा एक खांब कोसळल्यानं 19 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात काही वाहनं दबली. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख व गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
दरम्यान, याप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात प्रकल्प अधिकाऱ्याचाही समावेश आहे. उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनकडून या पुलाचं बांधकाम सुरू होते. मध्यरात्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली. जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाला युद्धपातळीवर मदत देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. योगी आदित्यनाथ यांनी दोषींविरोधात कारवाईचंही आश्वासन दिले होते. शिवाय, दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक समितीदेखील स्थापन केली आहे. या समितीला 48 तासांमध्ये अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींमधील सात पैकी दोन जणांचा प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.