श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी निवडणुकीमध्ये बाधा आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. पाकिस्तानच्या सीमेकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी जवळपास 250 दहशतवादी तयारीत असल्याचा इशारा सुरक्षा दलांना देण्यात आला आहे. तसेच काश्मीर खोऱ्यामध्ये 300 दहशतवादी सक्रीय आहेत.
हे दहशतवादी निवडणुकीवेळी मोठा घातपात करण्याच्या इराद्याने काश्मीरमध्ये घुसणार आहेत. सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय जवानांना इशारा देण्यात आला असून लष्करासह पोलीस आणि सीमा सुरक्षा दलांनी दक्षता वाढविली आहे. दहशतवाद्यांना खोऱ्यात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सोमवारपासून चार टप्प्यांत स्थानिक निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार न पाडण्यासाठी पाकिस्तानकडून काही आगळीक केली जाण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षा दलांना तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात सांगण्यात आले आहे. वाहनांची तपासणी सोबतच संदिग्ध व्यक्तींवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय श्वानपथकालाही ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांवरही हल्ले होण्याची शक्यता असल्याने त्यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे.