जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) वैष्णो देवी मंदिर (Vaishnodevi temple) परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर 13 हून अधिक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी वैष्णो देवी मंदिर भवन परिसरात शनिवारी पहाटे 2.45 वाजता चेंगराचेंगरी झाली. यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. तसेच, चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले.
सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रियासी येथील नियंत्रण कक्षाने सांगितले की, कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोक जखमी झाल्याचे वृत्त असून सध्या बचावकार्य सुरू आहे. चेंगराचेंगरीनंतर प्रशासन आणि व्यवस्थापनाने पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैष्णो देवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, या घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांसाठी 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.