थिरुअनंतपुरम: केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात आता शिगेला या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लोकांना सावध राहावं, काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी केलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.कोझिकोड जिल्ह्यात एका दीड वर्षीय मुलाला पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होऊ लागल्यानं त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला शिगेला जीवाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती काल डॉक्टरांनी दिली. शिगेला जीवाणूंमुळे शिगेलॉसिस हा आतड्यांचा आजार होऊ शकतो. केरळमध्ये आतापर्यंत शिगेलाचे ८ रुग्ण सापडले आहेत.शिगेलाचे रुग्ण आढळून येऊ लागल्यां कोझिकोड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अलर्टवर आहे. कोझिकोड जिल्हा याआधी निपाह विषाणूचे रुग्ण सापडल्यानं चर्चेत आला होता. 'जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याची आवश्यकता नाही. प्रशासन आवश्यक पावलं उचलत आहे,' अशी माहिती कोझिकोडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. जयश्री यांनी दिली.लोकांनी सतर्क राहावं आणि अतिसाराचा त्रास होताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन डॉ. जयश्री यांनी दिला. अतिसार हे शिगेला संसर्गाचं प्रमुख लक्षण आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात २६ जणांना अतिसाराचा त्रास झाला आहे. संक्रमित जेवण आणि पाण्यामुळे शिगेला जीवाणूचा संसर्ग होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.केरळमधील मुंडिक्कल्थजम, कोट्टापरंबू आणि वायनाडमध्ये शिगेलाचे रुग्ण आढळून आले आहेत. शिगेलामुळे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. कोझिकोडमध्ये १९ डिसेंबरला एक ११ वर्षीय मुलगा शिगेलाचा बळी ठरला.
कोरोनानंतर आता 'शिगेला'चा धोका; केरळमध्ये ८ रुग्ण सापडल्यानं खळबळ
By कुणाल गवाणकर | Published: December 25, 2020 8:19 AM