नवी दिल्ली : ‘द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया अकाऊंटस् नाही’ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याच्या व्यक्त केलेल्या विचारांवर सोमवारी टीका केली. मोदींनी केलेले ट्विट टॅग करीत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, ‘द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया अकाऊंटस् नको.’ काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही टि्वटरवर म्हटले आहे की, ‘आदरणीय मोदीजी, तुमच्या नावाने ज्या लोकांची टोळी प्रत्येक क्षणाला वाईट भाषा वापरते, धमक्या देते, त्रास देते त्यांना हा सल्ला द्या.’अमृता फडणवीसही सोशल मीडियापासून दूर जाणारसोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या अमृता फडणवीस यांनीही सोशल मीडिया सोडण्याचा विचार असल्याचे ट्विट केले. सोशल मीडिया सोडण्याबाबतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट शेअर करीत अमृता फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. काही छोटे निर्णय आयुष्य बदलू शकतात, असेही त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असलेल्या व जगभरात कोट्यवधी ‘फॉलोअर्स’ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजमाध्यमांना सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी रात्री अचानक जाहीर केला. समाजमाध्यमांच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे. असे असूनही जनतेशी संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमांतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार त्यांनी का केला, हे समजू शकलेले नाही. रात्री ८.५२ वाजता हा धक्का देताना मोदी यांनी लिहिले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन, असंही मोदींनी सांगितलं आहे.