पक्ष सोडा आणि पर्यायी सरकार बनवा, भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसची खुली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:40 PM2020-01-13T15:40:16+5:302020-01-13T15:41:37+5:30
भाजपाच्या नेतृत्वातील सरकारचा राजीनामा देऊन पर्यायी सरकार स्थापन करण्याचे केले आवाहन
गुवाहाटी - देशात लागू झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आसाममध्ये मोठी खेळी केली आहे. आसामचे हित विचारात घेऊन मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भाजपाच्या सरकारला सोडचिठ्ठी देत पर्यायी सरकार स्थापन करावे, अशी खुली ऑफर आसाममधील काँग्रेसच्या विधिमंडळ दलाचे नेते देबब्रत सायकिया यांनी दिली आहे.
देबब्रत सायकिया यांनी आसामच्या अस्मितेचा हवाला देत सोनोवाल यांना ही ऑफर दिली आहे. ''सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यात असे सरकार स्थापन करावे जे आसाम अकॉर्डला पाठिंबा देईल आणि नारगिकत्व दुरुस्ती कायदा राज्यात लागू होण्यास स्थगिती देईल,''असे आवाहन देबब्रत सायकिया यांनी केले.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा आसाम अकॉर्डचे उल्लंघन करणारा आहे. राज्यात आसाम अकॉर्ड लागू करण्यासाठी आसामच्या विधानसभेत प्रस्ताव पारित करण्यात यावा, तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी होणेही थांबवले पाहिजे, असेही सायकिया यांनी सांगितले. राज्यात आसाम अकॉर्ड लागू करण्यात यावे अशी विनंती राज्यपालांकडेही केली. तसेच राज्याच्या हितासाठी सोनोवाल यांनी भाजपाचे सरकार सोडून पर्यायी सरकार स्थापन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विरोध झाला तरी नागरिकत्व कायदा राबवूच; अमित शहांनी ठणकावले
'कुणाचेही नागरिकत्व धोक्यात आलेले नाही; जेएनयूमध्ये प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींची उपस्थिती'
CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा सर्वात आधी लागू करणार, योगी सरकारचा निर्णय
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आसाममध्ये सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होत आहे. हा कायदा म्हणजे आसामची संस्कृती आणि अस्मितेवरील हल्ला आहे, असा आरोप आसामी लोक करत आहेत. राज्यात परदेशी नागरिकांना राहू देणार नाही, अशी घोषणा स्वत: मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले आहे. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून आसामचे राजकारण नेमके कोणते वळण घेते हे पाहावे लागेल.