नोएडा : विविध मुद्यांवर गोंधळ आणि नारेबाजी करून संसदेचे कामकाज हाणून पाडणाऱ्या काँगे्रसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार कानपिचक्या दिल्या. तब्बल सहा दशके देशावर राज्य करणाऱ्यांना आता संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नवीन वर्षात तरी काँग्रेस नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरक्षित चालू देण्याचा संकल्प सोडून देशाच्या विकासात सहकार्य द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. अर्थात, ‘आरोपी मंत्र्यांना हटवा आणि संसद चालवा’, असे आक्रमक प्रत्युत्तर काँग्रेसने तातडीने दिले. दिल्ली-मेरठ या १४ पदरी दु्रतगती मार्गाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. काँगे्रसला लक्ष्य करताना ते म्हणाले की, संसद कायदे बनविण्याचे ठिकाण आहे. मात्र जनतेने कौल नाकारलेले लोक संसदेचे कामकाज रोखू पाहत आहेत. गरीबांच्या विकासासाठी संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहन मी विरोधकांना करीत आहे. संसदेचे कामकाज हाणून पाडणाऱ्यांनी किमान नव्या वर्षांत तरी संसद सुरळीत चालू देण्याचा संकल्प सोडावा. संसदेच्या ताज्या हिवाळी अधिवेशनात जीएसटीसह काही महत्त्वपूर्ण विधेयके पारित होऊ शकली नाहीत. विरोधक संसद चालू देत नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला काँग्रेसने गुरुवारी सडेतोड उत्तर दिले. संसद सुरळीत चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळेच सरकारने आरोपी मंत्र्यांना हटवावे आणि संसदेच्या कामकाजाला गती द्यावी, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले. संसद सरकार चालवते. विरोधकांची जबाबदारी जनतेचा आवाज बनून लढण्याची आहे, असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)- मोदी आपल्या नाकर्तेपणाचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडण्यात तरबेज आहेत. मात्र संसदेतील विरोधकांच्या गोंधळाबाबत त्यांनी आत्मचिंतन करायला हवे. - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज,अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर विविध प्रकरणांत आरोप लागले आहेत. मोदींनी या सर्वांना हटवले पाहिजे, असे रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले.
नव्या वर्षात संसद चालू देण्याचा संकल्प सोडा
By admin | Published: January 01, 2016 2:11 AM