ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - भारताने तवांग क्षेत्रावरील दावा सोडल्यास सीमावाद संपुष्टात येईल हा चीनचा विचार भारताने लागलीच फेटाळून लावला आहे. चीनचे माजी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी दायी बिंगुओ यांनी एका मुलाखतीत भारताने अरुणाचलप्रदेशमधील तवांगवरील दावा सोडल्यास दोन्ही देशांमधील वाद मिटेल असे विधान केले होते.
त्यावर भारतीय अधिका-यांनी व्यवहारीक दृष्टया हे शक्य नसल्याने स्पष्ट करीत चीनचा विचार फेटाळून लावला आहे. रणनितीक दृष्टया तवांगवरील दावा सोडणे भारताला परवडणारे नाही. 2003 ते 2013 अशी दहावर्ष दायी बिंगुओ यांनी भारताबरोबरचा सीमावाद सोडवण्यासाठी चीनचे प्रतिनिधीत्व केले.
आणखी वाचा
पूर्वसीमेवर भारताने चीनची काळजी घेतली तर,चीनही तशाच प्रकारे प्रतिसाद देईल म्हणजेच अक्साई चीनचा भूभाग परत करु शकतो असे त्यांचे म्हणणे होते. सूत्रांच्या माहितीनुसार दायी अजूनही चीन सरकारच्या खूप जवळचे समजले जातात. तसेच राजकीयदृष्ट्या चीनमध्ये त्यांना गांभीर्यानं घेतलं जातं. कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीशिवाय दायी मुलाखतीत याची वाच्यता करणार नाहीत, असं अनेकांचं म्हणणं आहे.