मजुरांना सुट्टी, सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश; सिलक्यारा बोगद्याचं पुढे काय होणार?, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:28 AM2023-11-30T11:28:11+5:302023-11-30T11:35:28+5:30

बचाव मोहिमेदरम्यान बंद असलेले सिलक्यारा बोगद्याजवळील रस्ते बुधवारी खुले करण्यात आले.

Leave to workers, order to conduct safety audit; What will happen next to Silkyara Tunnel?, Lets Know... | मजुरांना सुट्टी, सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश; सिलक्यारा बोगद्याचं पुढे काय होणार?, जाणून घ्या...

मजुरांना सुट्टी, सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश; सिलक्यारा बोगद्याचं पुढे काय होणार?, जाणून घ्या...

नवी दिल्ली: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात सिलक्यारा बोगद्यातून मंगळवारी संध्याकाळी ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. देश आणि जगातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली १७ दिवस येथे बचावकार्य सुरू होते. 

बचाव मोहिमेदरम्यान बंद असलेले सिलक्यारा बोगद्याजवळील रस्ते बुधवारी खुले करण्यात आले. मात्र, घटनास्थळी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सरकारने बोगद्याचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. येथे काम करणाऱ्या मजुरांना सुट्टी देण्यात आली आहे. अशा स्थितीत या बोगद्याचे भवितव्य काय असेल, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

उत्तराखंड सरकारचे सचिव नीरज खैरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ड्रिलिंगमध्ये यश मिळाल्यानंतर उभ्या ड्रिलिंग थांबवण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक एजन्सींनी बचाव कार्य केले. एनडीआरएफच्या म्हणण्यानुसार, ६० जवान बचावस्थळी तळ ठोकून होते. २० जवान स्टँडबाय होते. बुधवारी या सर्वांना परतण्यास सांगण्यात आले. 

'१२ हजार कोटींचा प्रकल्प'

१२ हजार कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी सिल्कयारा बोगदा प्रकल्प ४.५ किलोमीटर लांबीचा आहे. केंद्र सरकारच्या ९०० किमी लांबीच्या 'चार धाम यात्रा ऑल वेदर रोड' प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग आहे. उत्तराखंड, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र शहरांना सर्व-हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. सिल्क्यरा ते बरकोट दरम्यानच्या राडी नावाच्या डोंगराला भोक पाडून हा बोगदा बांधला जात आहे. मात्र, त्याच्या बांधकामातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात बांधकाम संस्था आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

'काही दिवस काम बंद राहणार'

सिलक्यारा बोगद्याचे काम काही दिवस बंद राहणार असल्याचे येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम थांबवण्यात आले आहे. कामगारांना दोन दिवस विश्रांती देण्यात आली आहे. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्याला दोन दिवस आराम करण्यास सांगितले आहे, त्यानंतर कंत्राटदाराकडून माहिती दिली जाईल. सेफ्टी ऑडिट होईपर्यंत काम थांबवण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Leave to workers, order to conduct safety audit; What will happen next to Silkyara Tunnel?, Lets Know...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.