नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) ५० माजी विद्यार्थ्यांच्या एका समूहाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य मागास वर्गाच्या अधिकारांची लढाई लढण्यासाठी आपल्या नोकºया सोडून एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे. या राजकीय संघटनेचे नाव ‘बहुजन आझाद पार्टी’ ठेवण्यात आले असून, निवडणूक आयोगाच्या मंजुरीची त्यांना प्रतीक्षा आहे.या समूहाचे नेतृत्व करणारे आणि वर्ष २०१५ मध्ये आयआयटी दिल्लीतून पदवी घेणारे नवीन कुमार यांनी सांगितले की, ५० जणांचा एक समूह आहे. सर्वजण वेगवेगळ्या संस्थेतील आहेत. सर्वांनी पक्षासाठी काम करण्यासाठी नोकºया सोडल्या आहेत. मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. तथापि, २०१९ ची निवडणूक लढणे हे आमचे ध्येय नाही. आम्ही घाईत कोणतेही काम करणार नाही. आम्ही २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीपासून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर पुढील लोकसभेचे लक्ष्य ठेवणार आहोत.या संघटनेत मुख्यत: एससी, एसटी आणि ओबीसीचे सदस्य आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मागासवर्गाला शिक्षण आणि रोजगाराच्या प्रकरणात त्यांचा हक्क मिळत नाही. या पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह अन्य नेत्यांची छायाचित्रे लावून सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे.
नोकऱ्यांवर पाणी सोडत ५० माजी आयआयटीयन घेणार राजकारणात उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:16 AM