ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - वाहनांमधील पेट्रोल किंवा डिझेल संपत आल्यावर आपल्याला पेट्रोल पंपाची आठवण येते. लागलीच पेट्रोल पंपावर जाऊन गाडीत पेट्रोल भरतो. पेट्रोल आणि डिझेलव्यतिरिक्त पंपावर इतर काही मिळत नसल्याचंही तुम्हाला माहितीच असेल. मात्र लवकरच तुम्हाल पेट्रोल पंपावर एलईडी बल्ब, ट्युबलाइट आणि छतावरील पंखे मिळणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू बाजारातील वाजवी दरापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पेट्रोल पंपावर खरेदीदारांना 65 रुपयांमध्ये एलईडी बल्ब, 230 रुपयांत ट्युबलाइट आणि 1150 रुपयांमध्ये छतावरील पंखे मिळणार आहेत. पेट्रोलियम मार्केटिंग करणा-या तीन सरकारी कंपन्या या वस्तू उपलब्ध करून देणार आहेत. भारतातील आघाडीच्या तीन पेट्रोलियम कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम ही सर्व उत्पादने सरकारी कंपनी असलेल्या इनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेज लिमिटेड(ईईएसएल)कडून घेऊन विकणार आहे. एका वरिष्ठ अधिका-याच्या मते, या उत्पादनांच्या विक्रीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम कंपन्या आणि ईईएसएलमध्ये एक करारही होणार होता. मात्र केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं निधन झाल्यामुळे हा करार बारगळला. लवकरच या करारांवर स्वाक्षरी केली जाणार असून, पेट्रोल पंपांवर या वस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या तिन्ही कंपन्यांचे देशभरात 53000हून अधिक पेट्रोल पंप आहेत. मात्र अजूनही ही उत्पादनं कोणकोणत्या पेट्रोल पंपांवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत हे अद्याप स्पष्ट नाही.
पेट्रोल पंपांवर लवकरच मिळणार एलईडी बल्ब, ट्युबलाइट आणि पंखे
By admin | Published: May 18, 2017 6:00 PM