छत्तीसगडच्या ग्रामीण भागातील दोन तरुणांनी नोकरी सोडून यूट्यूब व्हिडीओ तयार करण्याचं काम सुरू केलं. सुरुवातीला ते महिन्याला जवळपास 15 हजार रुपये कमावत होते. पण आज चॅनेलमुळे तब्बल 40 हजार रुपये कमावत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या या तरुणांची गोष्ट अत्यंत हृदयस्पर्शी आहे. या तरुणांनी बॉलिवूडचं स्वप्न पाहिलं पण ते आता यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडीओ तयार करून आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजपूर जिल्ह्यातील तुलसी या छोट्याशा गावात हे तरुण राहतात. ज्ञानेंद्र शुक्ला आणि जय वर्मा असं या दोघांचं नाव आहे. ज्ञानेंद्र आणि जयसोबत गावातील अनेक लोकही त्यांच्या व्हिडीओमध्ये अभिनय करतात. त्यांनी 2018 मध्ये Being Chhattisgarhiya या चॅनलची सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत 200 व्हिडीओ अपलोड केले आहेत.
व्हिडीओमध्ये एक्शन, ड्रामा, एज्युकेशन असं सर्व जे बॉलिवूड चित्रपटात असतं, तसंच सर्व पाहायला मिळतं. रॉयटर्ससोबत संवाद साधताना ज्ञानेंद्र शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आम्हाला कोणत्या प्रकारचे नेमके व्हिडीओ तयार करायचे आणि ते कसे तयार करायचे याबाबत अजिबात माहिती नव्हती. आम्ही शूट करण्यासाठी आणि पब्लिश करण्यासाठी मोबाईलचा वापर केला.
काही दिवसांनंतर आम्हाला अपग्रेड होणं गरजेचं असल्याचं जाणवलं. ज्यानंतर आम्ही नीट तयारी करून काम करण्यास सुरुवात केली. जय वर्माने आम्हाला फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग आता ओळखतं असं म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये काम करणाऱ्या पिंकी साहूने मी अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहतेय. मला संधी मिळाली तर मी नक्कीच बॉलिवूडमध्ये जाईन असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"